Header Ads

Header ADS

धर्माच्या दलालांचे '१४ एप्रिल' मराठा विरुद्ध दलित भडका उडवून देण्यासाठी कट कारस्थान !

महाराणी ताराबाईसाहेबांच्या जयंतीविषयी इतिहास संशोधन काय सांगते ?


आज महाराणी ताराबाईसाहेब यांची जयंती आहे अशा पोस्ट Facebook , whatsapp वर येत आहेत . महाराणी ताराबाईसाहेब या जगाच्या इतिहासातील एक महापराक्रमी स्त्री आहेत. जगात राज्य स्थापन करणारी कर्तृत्ववान महिला म्हणून एकमेव महाराणी ताराबाईसाहेबांचेच नाव घ्यावे लागते . अशा या महाराणी ताराबाईसाहेबांचा इतिहास अजूनही म्हणावा इतका लोकांसमोर आलेला नाही . या विषयावर स्वातंत्र्यपूर्व काळात राजर्षी शाहू महाराजांनी महाराणी ताराबाईसाहेबांची स्मारके बांधून ताराबाईंचा इतिहास लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला . त्यानंतर बेळगावच्या कैसर - ए - हिंद रंगूबाईसाहेब जाधव भोसले यांनी महाराणी ताराबाईसाहेबांचे एक विस्तृत चरित्र प्रकाशित केले . त्याच नाव ' मोंगलमर्दिनी महाराणी ताराबाई ' . हे चरित्र आल्यानंतर खर्या अर्थाने महाराणी ताराबाईसाहेबांचा इतिहास लोकांसमोर येऊ लागला . त्यानंतर ब्रिज किशोर नावाच्या संशोधकाने अस्सल साधनांच्या आधारावर लिहलेले Tarabai and her times या नावाचे इंग्रजी चरित्र प्रकाशित केले .याच वेळी कोल्हापूरमध्ये स्थापन झालेल्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरु आणि मराठ्यांच्या इतिहासाचे महान संशोधक डाॕ. आप्पासाहेब पवार यांनी महाराणी ताराबाईंच्या संबंधातील कागदपत्रे संकलित केली आणि त्यातून महाराणी ताराबाईसाहेबांच्या कागदपञांचे तीन खंड ' ताराबाईकालीन कागदपत्रे - खंड १,२ व ३ अशी प्रकाशित केली . आणि मग डाॕ. जयसिंगराव पवार यांनी महाराणी ताराबाईंचा औरंगजेबाशी झालेला झगडा ' महाराणी ताराबाई ' यांच्या इ.स. १७०७ पर्यतच्या चरिञातून लोकांसमोर मांडला . यानंतर शालिनीताई पाटील यांनी महाराणी ताराबाईसाहेब यांचेवर Ph.d चा प्रबंध सादर केला ; व त्यानंतर त्यांनी महाराणी ताराबाईसाहेबांवर एक पुस्तक ही काढले . असा हा महाराणी ताराबाईसाहेबांच्या वरील संशोधनाचा प्रवास आहे . याच दरम्यान मराठी रियासत लिहणारे गो. स. सरदेसाई व करवीर रियासत लिहणारे स. मा. गर्गे यांनीही महाराणी ताराबाईसाहेबांवर लिहलेले होते पण ते स्वतंत्र पुस्तक रुपात नव्हते तर त्यांनी थोडक्यात त्यांच्या कारकिर्दीवर लिहलेले आहे.
महाराणी ताराबाईंच्या यासर्व संशोधकीय घडामोडी या ७० ते ८० वर्षीतील आहेत . आणि या विषयावर सखोल संशोधन करणारे डाॕ. आप्पासाहेब पवार असतील , रंगूबाईसाहेब जाधव भोसले असतील , ब्रिज किशोर असतील , किंवा डाॕ. जयसिंगराव पवार सर असतील अशा कोणत्याही संशोधकांना महाराणी ताराबाईसाहेबांची जन्मतिथी ही आजपर्यंत कोणत्याही संदर्भ साधनात मिळून आलेली नाही . असे असले तरी महाराणी ताराबाईसाहेबांचे जन्मसाल या संशोधकांनी सुसंगत तर्काच्या आधारावर माञ दिलेले आहे. ते आहे शिवराज्याभिषेक साल म्हणजे इ. स. १६७४. यासाठी त्यांनी आधार असे वापरले आहेत की , महाराणी ताराबाईसाहेबांचे निधन हे इ. स. १७६१ साली सातारच्या किल्ल्यावर झाले आणि त्यांचा दहन विधी हा त्यांचे नातू रामराजे त्यावेळी सातारा गादीवर होते त्यांनी संगममाहुली याठिकाणी केला आणि त्यानंतर दशम एकादशम् विधी म्हणजे महाराणी ताराबाईसाहेबांचा दहावा दिवस करताना त्यांनी एक सनद दिली त्यामुळे महाराणी ताराबाईसाहेबांची निधनाची तिथी व दिवस हा आपणाला समजतो. त्याच बरोबर यावेळच्याच कागदपञात महाराणी ताराबाईसाहेबांचे वय ८६ वर्षाचे नोंदवले आहे. आणि म्हणून ८६ वर्षांच्या असताना निधन पावल्या याचाच अर्थ त्यांचा जन्म हा १६७४ - ७५ साली झाला असा संशोधकांनी सुसंगत तर्काच्या आधारे मांडले आहे. हे सर्वांनी मान्य करावे लागते. याविषयी दुमत नाही .पण आजपर्यंत महाराणी ताराबाईसाहेबांचा जन्म हा या - या तारखेला या - या ठिकाणी झाला असे कुठल्याही संदर्भ साधनात किंवा ज्याला इतिहास लेखनात दुय्यम साधन मानले जाते अशा बखरीतही किंवा इतरही कुठेही लिहले गेलेल नाही.

आजपर्यंत म्हणजे मागच्या वर्षीपर्यत महाराणी ताराबाईसाहेबांची जयंती १४ एप्रिलला आहे असे कुठंही नोंदवलं गेलेल नव्हते. मागच्या वर्षी विकीपिडीयामध्ये ज्याच्या आधारावर आज महाराणी ताराबाईसाहेबांची जयंती साजरी केली जात आहे , त्या विकीपिडीयामध्ये इतिहासाच्या अनेक चुका आहेत. विकीपिडीया म्हणजे काही इतिहासाचे संदर्भ साधन नव्हे. या विकीपिडीयामध्ये अनेक लोक बदल करु शकतात . तसाच बदल मागील वर्षी कुणीतरी महाराणी ताराबाईसाहेबांच्या जन्म तारखे बद्दल केला आणि तिथे १४ एप्रिल ही तारीख कुठलाही संदर्भ न देता त्याठिकाणी टाकली. आणि त्यामुळेच आजच्या दिवशी डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते यादिवशी महाराणी ताराबाईसाहेबांच्या जयंतीच्या पोस्ट सर्वत्र अतिशय वेगाने व्हायरल झाल्या .

या विषयावर हा विकीपिडीयामध्ये बदल कुणी केला ? त्या व्यक्तीकडे या विषयाचे काही संदर्भ साधने आहेत का ? कारण जर महाराणी ताराबाईसाहेबांवर संशोधन करण्यात आयुष्य वेचलेल्या डाॕ. आप्पासाहेब पवारांपासून रंगूबाईसाहेब जाधवांपासून , डाॕ. जयसिंगराव पवारांपासून ते तरुण इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या पर्यत जर कुणाला संदर्भ मिळाले नसतील तर या व्यक्तीला कुठं संदर्भ मिळाला आणि तो संदर्भ त्या व्यक्तीने कुठल्या इतिहास परिषदेत शोधनिबंध वाचला आहे किंवा इतर कुठे त्यांने हा शोधनिबंध वाचला वा प्रकाशित केला आहे किंवा संशोधनात्मक अशा कोणत्या पुस्तकात त्यांनी हा विषय विस्तृतपणे मांडलेला आहे असे आजपर्यंत इतिहासाच्या अभ्यासकांच्या नजरेत आलेले नाही . त्यामुळे आज महाराणी ताराबाईसाहेबांची जयंती आहे अशा ज्या पोस्ट फिरत आहेत त्यासर्व माझ्या बांधवांना माझी विनंती आहे की , मराठ्यांच्या इतिहासात अगोदरच अनेक वाद आहेत हे वाद पुन्हा वाढू नयेत याची आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि खर्या अर्थाने महाराणी ताराबाईसाहेबांचे चरित्र जसं जसं लोकांसमोर येईल तसं तसं महाराणी ताराबाईसाहेब या जागतिक व्यक्तीमत्व होणार आहेत. आणि अशा व्यक्तीच्या जन्मतारखेबद्दलच जर आपण चुकीची माहिती दिली तर पुढे जेव्हा हे चरित्र सर्वव्यापी होईल , विश्ववंदणीय होईल त्यातून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न लोक करतील त्यावेळी त्यांच्या जन्मतारखेलाच जर काही बुड नसेल , जन्मतिथीचा काही संदर्भ नसेल तर त्यांच्या पराक्रमावरही काही लोक आक्षेप घेऊ शकतात. आणि म्हणून कृपा करून ज्या गोष्टीला इतिहासात आधार नाही अशी १४ एप्रिल ही महाराणी ताराबाईसाहेबांच्या जयंतीची पोस्ट आपण फिरवू नका. अशी माझी आपणाला नम्र व कळकळीची विनंती आहे ...

डाॕ. देविकाराणी पाटील
१४ एप्रिल २०२०

No comments

Powered by Blogger.