Header Ads

Header ADS

 


★★परिवर्तनाचा "सुगावा" लावणारे प्रा. विलास वाघ सर!★★★

सकाळी एका स्नेहीने मला फोन करून माहिती दिली. अरे विश्वा तुझ्या कादंबरीची रचना आणि सूचना सांगणारे वाघ सर आता नाहीत रे!


मी म्हणालो असं बोलू नकोस काहीही. मला खरं काय ते सांग. आणि त्याने माहिती दिली. की गेली काही दिवस वाघ सर आजारी होते. कार्यालयीन कामकाज आणि विचारांचं मंथन यांनी ते जीर्ण पणासारखे जाहले होते. आणि या कोरोनाच्या काळात त्यांनी विविधांगी विश्लेषण केले होते. 


मी आजही तो सुगवाचा अंक वाचतो आहे. आणि माझ्या हाती पडलेला पहिला अंक मी बोराडी  ता शिरपूर, धुळे येथे वाचतो आहे. संपादकीय वाचून तो अंक मी होस्टेलवर आणतो आणि भराभर वाचून घेतो. अंक आवडतो. त्या अंकाची रचना, संपादकीय, त्यातील घेतलेले लेख आणि त्यातील वैचारिक बांधणी ही प्रामुख्याने आजही भुरळ घालते. मी ठरवलं होतं की या अंकाच्या संपादकांना भेटायचं कुठेही असो. आणि माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी पुणेला आलो. इथे बऱ्याच संपदकांशी मैत्रीही झाली पण वाघ सरांशी भेट नव्हती. शोधत होतो. शेवटी सदाशिव पेठेत पोचलो. आणि जानेवारी 2019ला भेट झाली सरांची. सर थकले होते. तरीही वैचारिक मांड अगदी आखड्यातल्या पैलवानासारखी निबर आणि भक्कम. 


सरांशी चर्चाच झाली त्यादिवशी. माझी ग्रामीण विषयावर त्यातल्या त्यात दलित जीवनावरील कादंबरी" निरप्या" यावर चर्चा होती ती. सर म्हणले लिहीत रहा. लिखाण सोडू नकोस. आणि हे बघ काही रचना तुला अंजून घ्याव्या लागतील. रचना सरळ वा घाव करणाऱ्या जितक्या तितक्या गुंता करणाऱ्या आणि वेड्यावाकड्या असू देत. बाज समजला की रचना समजते. बाज समजून घे. विश्लेषित कर. आणि माध्यम तूच तुझ्या भाषेतील बोलीतील ठेव. असं ते त्यावेळी म्हणत होते. 

ह्या म्हयासारख्या नवख्या लिखाणकराला महत्वाचं आणि तितकंच अमोल असं होतं. त्या नोंदी करून घेतल्या. आणि पुन्हा केव्हा तरी भेट करेन. असं म्हणून मी पुन्हा फिरलो.

आज ही बातमी मित्राकडून कळली आणि हताश झालो. सुगव्याचा विद्रोही वाघ आता गाढ निद्रिस्त झाला आहे. 

पण सरांचं वाक्य- वाघ झोपला म्हणून त्याचा करारी बाणा झोपला असं नाही. बाबासाहेबांनी आपल्याला बाणा दिलाय. असे कित्येक वाघ होतील. बाणा झोपला नाही पाहिजे.

कित्ती कळावरचं भाष्य करून गेलात सर तुम्ही!

 

सरांविषयी- सुगावा प्रकाशनाचे सर्वेसर्वा, फुले शाहू आंबेडकरी विचारांचे अग्रदूत, आंतरजातीय धर्मीय विवाह चळवळीचे अग्रणी, तसेच वंचित, दुर्लक्षीत समाज घटकांच्या शिक्षणासाठी झटणारे प्रा. विलास वाघ यांचे गुरुवारी (दि.25) पहाटे 6 वाजताच्या सुमारास कोरोनामुळे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. सुगावा प्रकाशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रबोधनात्मक परिवर्तनवादी साहित्याची निर्मिती केली. विविध  पुरोगामी संस्था-संघटना यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध होता.


प्रा. विलास वाघ यांच्या जीवन प्रवासावर एक नजर -- 1 मार्च 1939 रोजी जन्म : मोराने तालुका जिल्हा धुळे- पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण मोराणे- पाचवी ते अकरावी माध्यमिक शिक्षण धुळे येथील गरुड विद्यालय-  जून 1958 एसएससी परीक्षा पास-  1958 ते 1962 पुण्यातील एसपी महाविद्यालयातून बी एस सी उत्तीर्ण-  जून 1962 कोकणातील नरडवणे गावात शिक्षकाची नोकरी-  1964 ते 1980 पुण्यातील अशोक विद्यालयात शिक्षकाची नोकरी -  1972 :  सुगावा प्रकाशनाची सुरुवात ते आजतागायत सुरू-  1981 बीएड उत्तीर्ण-  1983 : उषा ताई वाघ याच्याशी आंतरजातीय विवाह: सरांच्या अनेक कामामध्ये ताईंचा पुढाकार-  1981 ते 86 पुणे विद्यापीठातील प्रौढ निरंतर शिक्षण विभागात रीडर म्हणून काम केले-  1986 पुणे विद्यापीठातील नोकरीचा राजीनामा-  1964-1980 या काळात वडारवाडीत बालवाडी सुरू केली. सर्वेषा सेवा संघामार्फत देवदासींच्या मुला मुलींसाठी पहिले वसतिगृह सुरू केले. राष्ट्र सेवा दलाच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे एक वर्ष अध्यक्ष.-  1972 समता शिक्षण संस्थेची स्थापना या संस्थेमार्फत महिलाश्रम वसतिगृह तळेगाव येथे सुरू केले. कस्तुरबा मुलींचे वस्तीग्रह तळेगाव ढमढेरे येथे सुरू केले. समता मुलांचे वस्तीगृह तळेगाव येथे सुरू केले. 1978 भटक्या विमुक्त जमातीच्या मुला-मुलींसाठी तळेगाव येथे आश्रम शाळा सुरू केली. 1989  मोराणे येथे भटक्या विमुक्त जमातीच्या मुला मुलींसाठी आश्रम शाळा सुरू केली.-  1994  मोराणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय सुरू केले. -  1996 सिद्धार्थ सहकारी बँकेच्या स्थापनेत पुढाकार, दोन वेळा चेअरमन. -  1974 पासून सुगावा मासिक सुरू केले.-  समाज प्रबोधन संस्था मासिकेचे पदाधिकारी.-  पीपल्स इंप्रुव्हमेंट ट्रस्टचे विश्वस्त.-  परिवर्तन मिश्र विवाह संस्थेची स्थापना.-  हुजूरपागा शिक्षण संस्थेत उषा ताई वाघ पदाधिकारी.

पुरस्कार --  69 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आळंदी येथे यशस्वी प्रकाशक म्हणून पुरस्कार.-  दलित साहित्य अकादमी नवी दिल्लीचा डॉक्टर आंबेडकर फेलोशिप.-  दलित मुक्तविद्यापीठ गुंटूर आंध्र प्रदेशचा डॉक्टर आंबेडकर फेलोशिप.-  महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांचा समाज प्रबोधन कार्यकर्ता पुरस्कार.-  औरंगाबाद येथील संस्थेचा लोक कैवारी पुरस्कार.-  आंबेडकर इंटरनॅशनल मिशन कॅनडा यांचा सुगावा मासिकाला पुरस्कार.-  प्रकाशन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विपू भागवत पुरस्कार.-  चार्वाक नागरी पतसंस्था नाशिक यांचा शांताबाई दाणी पुरस्कार.-  समता प्रतिष्ठान पुणे यांच्यातर्फे दिनकरराव जवळकर पुरस्कार-  दादासाहेब रुपवते फाउंडेशनचा समाजभूषण पुरस्कार-  पुणे विद्यापीठात आंबेडकर अध्यासनाच्या संचालक पदी नेमणूक.-  दया पवार स्मृती पुरस्कार.-  पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार.-  आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान जळगाव यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित अस्मिता पुरस्कार.

झोपडपट्टीत काम करायला सुरुवात केली होती. वडार समाजातील मुलांसाठी बालवाडी चालवली. देवदासींच्या मुलांसाठी वसतिगृह चालवले. रेडलाइट एरियातील वेश्यांचे उंबरठे झिजवत विलासदादा आणि उषाताई तिथली मुलं गोळा करू लागले. त्यांना शाळेत नेऊ लागले. त्यांच्यातला माणूस जागा करू लागले. बापाच्या नावाची जागा कोरी ठेवणा-या मुलांचे विलासदादा आणि उषाताई आईवडील झाले. असंख्य जिवांचा ते आधारवड ठरले. अनेकांना अंधश्रद्धेतून, धर्माच्या नावाखाली चालणा-या वाईट चालीरीतीतून त्यांनी वर आणलं. त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवलं. प्रा. विलासदादा वाघ 2006 या वर्षी पुणे बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख होते. विलासदादा म्हणतात, ‘मी सेवादलात वाढलो, समाजवाद्यांत वावरलो, हे सारे खरे आहे; पण मूलत: मी आंबेडकरवादी आहे.’ आंबेडकर विचारांचे पाईक असलेल्या विलासदादांचे कार्य प्रबोधनाच्या चळवळीतील मैलाचा दगड ठरले आहे.

सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर धडपडत राहिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जात‌ आणि वर्गविरहित समाजाच्या निर्मितीचे स्वप्न साकार करण्याचे ध्येय त्यांनी उराशी बाळगलं होतं. जातिनिर्मूलन, प्रौढ शिक्षण, वसतिगृहे आणि साहित्याच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य त्यांनी केले. वेश्यांच्या मुलांसाठीही त्यांनी संस्था सुरू केली होती. दोन आश्रमशाळा, चार वसतिगृहे आणि एक महाविद्यालय त्यांनी उभे केले.


पुणे जिल्ह्यातील भुकूम इथे दलित कुटुंबांना घेऊन त्यांनी सामूहिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला होता. सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक मानसन्मान लाभले होते. महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले होते. ‘सुगावा’ हे मराठीतील मासिक देखील ते चालवत होते. त्यातूनच पुढं सुरू केलेल्या सुगावा प्रकाशनाच्या माध्यमातून सामाजिक चळवळीला मार्गदर्शक ठरू शकतील अशी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक पुस्तके त्यांनी प्रकाशित केली होती. त्यांच्या ‘सुगावा’ मासिकाला २००३ सालचा ‘इंटरनॅशनल मिशन कॅनडा’ पुरस्कार देखील मिळाला होता.शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांद्वारे आयुष्यभर धडपडत राहिले. या कामात येणाऱ्या संकटांना निर्भयपणे तोंड देणारे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि इतरांसाठी आधार देणारे व्यक्तिमत्त्व असा त्यांचा लौकिक होता. विलास वाघ यांचे सामाजिक काम चौफेर होते. जातिनिर्मूलन, प्रौढ शिक्षण, वसतिगृहे आणि साहित्याच्या माध्यमातून प्रबोधन असे काम त्यांनी उभे केले होते. वेश्यांच्या मुलांसाठीही त्यांनी संस्था सुरू केली होती. दोन आश्रमशाळा, चार वसतिगृहे आणि एका महाविद्यालयाचा डोलारा वाघ यांनी उभा केला होता. 


-विश्वनाथ अर्जुन साठे (9921056462)

No comments

Powered by Blogger.