Header Ads

Header ADS

  

★★★एक चिडीया - भारतीय चित्रपट संहितेची कालखंडिय उकल★★★

*शिक्षाप्रद्योगिकी केंद्र प्रस्तुत 'एक चिडीया' बालचित्रफितीची समीक्षा*


ती- ऐक नं, अशा काळात मी एक चित्रफीत पाहिली. पण मला त्यातील संविधानिक मूल्य समजून घ्यायची आहेत. तुमचं काय मत आहे
ती- ही चित्रफीत बनवली तो काळ या मूल्यांना मानत होता?
तो- तेच तयार करतो आहे...मला सत्य शोधायचं आहे.
कारण प्रत्येक काळात असं साहित्य आणि चित्रफिती मिडीयाने जनतेला दिल्या आहेत समीक्षण करायला पण समीक्षण करतो कोण?
ती- स्वातंत्र्यनंतरचा काळ आहे नं हा?
तो- होय! कदाचित ऐंशीपंच्याशीचं दशक नक्कीच..
ती- हा तर भारताच्या इतिहासातील जडणघडणीचा काळ!
तो- होय! अजून जागतिकीकरण यायचं बाकी होतं! असं म्हणणं ही ठीक नाही कारण या काळाच्या पोटात जागतिकीकरण खेळत होतं. नवे करार होत होते. संगणकावर आधारित प्रणाली आता भारतातील सर्वसामान्य जगतेच्या हातात आली होती.
ती- खरंतर हा काळ सर्वगोष्टीना सामावून घेणारा होता.
आजचा काळ कुण्या एका बाजूला वळणारा आहे का? याचीही चिकित्सा करतांना या चित्रफितीची भूमिका समजते का?
तो- होय...परंतु एक उद्धस्त अशी भूमिकाही होती या काळाच्या पोटात वाढू लागली आणि पुढील नव्वदी दशकात तेच जन्माला आलं. जागतिकीकरणाच्या अजगरी हुंकाराने बरंच काही शोषनीविळख्यात गेलं आहे. तितकंच नव्यानं उभरून आलं आहे. हे जाणं किंवा नव्याने येणं चांगलं की वांगलं, योग्य की अयोग्य काळ ठरवत असतो.
ती- जागतिकीकरणाचे फायदे तोटे दोन्ही लक्षात घ्यावे लागतील?
तो- होय, अगदी! भांडवलशाही जगाने जनतेचा पिळा घडवून आणला. उसाच्या चरख्यात जणू उसाचा चोथा व्हावा तसा मानव पुढील काळात जगू लागला आहे. आणि याची परिणीती म्हणून 'एकात्मिक बल' हे 'जागतिकिय ऐक्याला' पूरक आणि पोषक आहे यार्थी या काळात विविध प्रयोग झाले. हे प्रयोग नाटक, संगीत, गीतं, कविता, कथा, कादंबऱ्या, पोवाडे, गझल, प्रवासवर्णने, चित्रपट संहिता, एकांकिका, मालिका, वेबसिरीज, वृत्तपत्रातील अग्रलेख, मुख्य बातम्या, कार्टून्स, चित्रकला, चळवळींच्या वैचारिक बांधणी, संस्थात्मक आणि व्यक्तिरुप हे प्रयोग झालेले आहेत.
                                    जागतिक स्तरावरील विविध वादांचेही सावलीप्रारूप या पंच्याशीच्या दशकात अभ्यासायला मिळते.
ती- या काळात काही रचनावादी विचारांची मांडणी झालेली दिसते. जर जागतिकीकरण झालं नसत तर काय झालं असत?
तो- आभासी जगात माणूस जवळ आला नसता. जो जवळ असूनही जवळ नाही!
ती- बरोबर. पण मुळात आपल्या समाजाची जडणघडण अशीच झाली आहे. त्याला जागतिकीकरण कारणीभूत नाही. समाजाची जडणघडण करण्यासाठी केवळ जागतिकीकरण हे एकमेव कारण आहे असं नाही. विविध अशी कारणे आहेत, इथली धर्मव्यवस्था, इथली समाजव्यवस्था, इथली नीतीव्यवस्था आणि इथली विचारांच्या मांडणीची व्यवस्था यामुळे जागतिकीकरणाचे एक केवळ कारण न दाखवता समाजाची जडणघडण झालेली आहे. ही जडणघडण विविध रचनांच्या माध्यमातून झालेली आहे हे आपले मत मला पटत आहे.
तो- कबिर, तुकाराम, फुले, शाहू, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्तृत्व हेच आहे. अनियतकालिकाच्या चळवळीने मराठी साहित्यात आत्मभान निर्माण करणारी चळवळ उभी केली. याच काळात दलित साहित्याच्या चळवळीचा उगम झाला. डॉ.बाबासाहेबांच्या ‘शिका-संघटित व्हा-संघर्ष करा’ या शिकवणुकीचे प्रत्यक्ष उपयोजन सुरू झाले. दलित समाजातील नवनवे लेखक आपले जीवनानुभव अभिव्यक्त करू लागले. राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांनी दलित पँथरची आक्रमक चळवळ महाराष्ट्रात उभी केली. या चळवळीने बहुजन समाजात नवे आत्मभान निर्माण केले.
                                    साहित्यातून विद्रोह प्रकट होऊ लागला. परंपरागत लादलेल्या गुलामीला जोरदार नकार आणि स्वातंत्र्य-समता-बंधुता या मूल्यांचा स्वीकार करणारे आवाज अधिक ठळक बनत गेले. प्रथम कविता, नंतर आत्मकथन, कथा, कादंबरी, नाटक या माध्यमातून परंपरागत साहित्याच्या आशयालाच नकार देत सामान्य, दलित, शोषित यांच्या जगण्याला स्वर प्राप्त झाला. बाबूराव बागुलांनी दलित साहित्याचे क्रांतिविज्ञान मांडून भक्कम वैचारिक भूमिका प्राप्त करून दिली.
ती- हे झालं भरतापूरतं जगाचं सांग न?
तो- जगाचा इतिहास पाहिला तर जगभर धार्मिक, नैतिक, राजकीय, आर्थिक, मानसिक, शैक्षणिक, राजसत्तीय कारणांनी स्त्रियांवर निरनिराळया प्रकारची बंधनं होती. काळ प्रचलन होत गेले तसे जगण्याच्या पद्धतीला पूरक असा स्त्री पुरुष समानता या अंगाने विचार होऊ लागला. याविरूद्ध विसाव्या शतकात आवाज उठवण्यात आला. यात सुरूवातीला राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, ‘सुधारक’कार आगरकर, महर्षी कर्वे वगैरे पुरूषच होते. स्वातंत्र्यानंतर भारताने जी राज्यघटना मान्य केली त्यात तर ‘स्त्रीपुरूष समानता’ हे महत्वाचे मूल्यं मानले गेले व त्यानुसार संधींची समानता आलीच. म्हणूनच आज स्त्रीवैमानिक, स्त्रीपोलीस अधिकारी वगैरे सर्रास दिसायला लागले आहेत. हे झाल्यानंतर 1980 च्या दशकात पुढच्या पिढीच्या स्त्रीमुक्तीचा लढा सुरू झाला. हासुद्धा जागतिक पातळीवर होता. "दी सेकंड सेक्स" या नावाजलेल्या वैचारिक कादंबरीची लेखक सीमान द बोव्हा यांना यार्थी जग वाचते आहे. जगाची वैचारिक पातळी या ऐंशीच्या दशकाच्या फटीत गुणात्मक तितकीच संख्यात्मक बदलली आहे. आणि साहजिकच भारतानेही "एकी हेच बळ" यार्थी एकात्मिक बाबींकडे 'स्त्री पुरुष समानता' दृष्टीने पाहणे सुरू केले आहे तो हा काळ आहे.
                                    संयुक्त राष्ट्रसंघाने तर 1980 चे दशक ‘स्त्रीमुक्तीचे दशक’ म्हणून घोषित केले होते. तेव्हा भारतात, खास करून महाराष्ट्रात स्त्रीमुक्ती चळवळीची मोठी लाट उसळली होती. तेव्हापासून स्त्रीवादी दृष्टीकोन, स्त्रीवादी समीक्षा, स्त्रीवादी साहित्य वगैरे संकल्पना चर्चेत आल्या. तेव्हाच्या स्त्रीमुक्तीच्या चळवळीचा सर्व भर पुरूषप्रधान संस्कृतीला आव्हान देण्यावर होता.मात्र याच काळात आणि अगदी आजही, स्त्रीमुक्तीच्या नेत्यांनी कलम 497 बद्दल गप्प बसणे पसंद केले. या अन्यायकारक कलमाबद्दल या महिला नेत्यांनी कधीही निषेधाचा एक शब्दही उच्चारला नव्हता. त्यांचा सर्व भर पुरूषप्रधान मानसिकतेला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यावर होता. ते त्याकाळी योग्यसुद्धा होते. आता सर्वोच्च न्यायालयानेच जेव्हा हा मुद्दा चर्चेला घेतल्यावर स्त्रीमुक्ती एक काळच्या आघाडीच्या नेत्या व अभ्यासक महिलेने एका अग्रगण्य मराठी दैनिकात लेख लिहून याला पाठिंबा दिला आहे.
                                    "तू तूहं जग. कोणाच्या भरवश्यावर जगू नको. हाताने भाकरी करून खा. वाट पाहू नको. हे शहर हाये. इथं मृत्यू जवळच फिरतोय. पाह्यटं कामावर गेलो तो परत येईल का नाही याची आस नाही. मृत्यू ओलाच बसला आहे." असा एक काळजीचा तितकाच गंभीर निष्काळजीचा सूर एक पोरगं आपल्या जन्मदात्या मायला बिनदिक्कतपणे म्हणतो आहे. असं म्हणण्यासाठी कोणत्या काळाच्या कंगोऱ्या त्याच्या काळजाला लागल्या असतील? कोणती विचारधारा त्याला संसर्ग करत असेल? कोणता प्रवाह त्याला ग्रासत असेल? नातेसंबंधाची कोणती लर त्याला हे विधानं करण्यासाठी झुंजवत आहे? याचा विचारही या काळात आहे.
                                    प्रत्येक काळाच्या प्रदरयुक्त अशा एकेक विचारधारा असतात आणि अशा अनेक विचारधारांच्या मालिका - शृंखला त्या काळावर समपातळीवर सुरू असतात. त्या त्या विचारधारा त्या त्या काळावर ठसा ठेवत असतात. त्याचबरोबर समाज मनावर आणि जगण्याच्या पद्धतींवरसुद्धा ठेवत असतात. ऐंशीच्या दशकामध्ये काही विचारधारा या संविधानिक मूल्यांना जितक्या प्रामाणिक होत्या त्या तितक्याच प्रामाणिक पुढे राहिल्या का? असा एक चिकित्सक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो.
ती- मला अस वाटते की परिवर्तन हे होतच असते पण त्यातुन आपण चांगलं घ्यायचं की वाईट हे आपल्या वर अवलंबून असते. दुर्दैवाने भारतात वाईट गोष्टी जास्त प्रमाणात झाल्या. प्रामाणिकता राहिल्या नाहीत काही अंशी.
तो- अच्छा! पण कालमापनाचं परीक्षण हे तस्थस्थ आणि तितकंच प्रामाणिक व्हायला हवं. या दशकामध्ये एक परिवर्तन सुद्धा झालेले आहे की जे परिवर्तन नैतिकदृष्ट्या सामाजिक विचारांचेपण आहे आणि सांस्कृतिकतेचेसुद्धा आहे. या काळात परिवर्तनामध्ये सामाजिक मूल्य आणि व्यक्तीमूल्ये महत्त्वाची होती तितकी सांस्कृतिक मूल्ये सुद्धा महत्वाची होती. सांस्कृतिक मूल्य बदलल्यामुळे सामाजिक मूल्यांचे बदल झालेले आहेत. असे वेगवेगळे चित्र यामध्ये दिसते आणि सांस्कृतिक मूल्यांचा प्रभाव सामाजिक मूल्यांवर झालेला आहे. हा एक वेगळा दृष्टिक्षेप या ठिकाणी दिसून येतो.
ती- हो...अगदी बरोबर. ह्या गोष्टी आजच्या काळात बदलायच्या म्हटलं तर काय करावं लागेल?
तो- मानवी जीवनात मानवतावादी मूल्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा असतो. सांस्कृतिक आणि सामाजिक तसेच त्या त्या देशांच्या संविधानिक मूल्यांच्या बाबतीत पहायला गेलं तर बदलाची भूमिका घेऊन काही काळानुसार परिवर्तनीय ठरतात. काही मूल्ये ही बदल असतात आणि काही मूल्ये बदल अपेक्षित असूनही ते बदलत नाहीत. यामध्ये दोन प्रकार पडतात बदलणारी मूल्ये आणि न बदलणारे मूल्य बदलणारी मूल्यांमध्ये सांस्कृतिक मूल्ये येतात. उदाहरणार्थ सांस्कृतिक मूल्य म्हणजे काय तर कुंकू लावणे, साडी नेसणे, लुगडी नेसणे ही सामजिक जितकी मूल्ये आहेत तितकीच ती सांप्रदायिक मूल्ये आहेत. भौगोलिक मर्यादेच्या बाबतीत सांस्कृतिक मूल्यांमध्ये विविधता आढळते. पण काळानुसार ही सांस्कृतिक मूल्ये बदलली. जगण्याच्या पद्धतीमध्ये बदल होत गेले आणि पेहेराव - वागण्या -  राहण्या - बोलण्यामध्ये हे बदल झालेले आहेत.
                                    सांस्कृतिक मूल्य हे कपड्यांसारखी असतात ते काळावर नेसल्या- फेडल्या जातात. मात्र सामाजिक मूल्य आणि संविधानिक मूल्य हे कधीही मोडून - जोडून येत नसतात ते तात्विक अनुभूती असतात. जगण्याचे मार्गक्रमण करीत असतात. सगळ्या मानवजातीला सारखी असतात. ऐक्य निर्माण करणारी असतात. एकपासून अनेकांना आणि अनेकांपासून व्यक्तिगत हिताचे असतात. बदलणाऱ्या गोष्टी ह्या काळावर आपोआप बदलत जातात आणि त्या बदलण्यासाठी समाज सुद्धा परिवर्तनीय असं कर की मुळात मानव हा परिवर्तनशील आहे. पृथ्वीच्या निसर्ग नियमाच्या तत्त्वाने तो बदल घेत जगत असतो. आणि त्यामुळेच या मूल्यांमध्येसुद्धा बदल होत जातात आणि हे बदल होणे साहजिकच असते.
ती- कित्ती सोप्प करून सांगितलं तू हे? मला वाटतं हा विचार इतका सोप्पा मला का नाही आला याचंच अप्रूप वाटतं तू हा विचार कित्ती आधी केला असशील?
तो- आधी आणि नंतर यापेक्षाही विचार असणं तो करणं आणि करत राहणं महत्वाचं. ऐंशीच्या दशकामध्ये चित्रपट संग्रहालयाने ही जी शॉर्टफिल्म म्हणा किंवा चित्रफीत तयार केलेली आहे. ही चित्रफीत एका नैतिक मूल्यांच्या आधारावर बनवलेली आहे. तिचे नैतिक मूल्य स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये 'सांघिक' आणि 'एकलं' अशा शब्दाने अनुसरून मानवी मूल्यांचा पुरस्कार करत आहे. शिवाय स्वातंत्र्यानंतर इथली काही संयुक्त भूभागाची मानसिकता होती. ही मानसिकता संयुक्त जनतेसाठी सुद्धा होती. याचा एक प्रत्यय सुद्धा या चित्रफितीच्या दीर्घांक आशयामध्ये येतो आहे. म्हणजे त्या चिमण्यांवर शिकऱ्याचे जाळे फेक करणं आणि चिमण्यांनी एकी दाखवून विचार करून ते जाळून घेऊन जाणं. शिवाय त्या जाळ्याला कुरतुडू कुरतडून कोरण्यासाठी उंदरांनी मदतीला धावून येणं हा एक नैतिकतेचा विचार या कालखंडामध्ये खूप महत्त्वाचा आणि मोलाचा आहे असं या चित्रफितीच्या निर्मिती समूहाला वाटलेला आहे. म्हणून एकतेतून अनेकता आणि अनेकतेतून एकतेची सुरक्षितता यावर काम करण्याचं, चित्रपट बनवण्याचं अशा काळामध्ये अशी चित्रपट बनवण्याचं एक मूल्य या काळावर चित्रपट संग्रहालयाने केलेला आहे.
ती- तुला माहितीच असेल की येत्या काही वर्षात पृथ्वीवर asteriod पडणार. अन कदाचित संपूर्ण पृथ्वीवरील जीवसृष्टी संपणार. म्हणूनच आपण व आपले शास्त्रज्ञ मंगल, चंद्र या ग्रहावर जीवश्रूष्टी पूरक वातावरण निर्माण करतोय.
तो- हं चर्चेत गेलाय हा विषय! कोणत्याही तात्विक मूल्यांचा विचार करणारी जी काही मनोवस्था असते ही मनोवस्था पुढील काही दशकांचा अभ्यास करत असते. या चित्रफिती मध्ये जागतिकीकरणाच्या आधीचा भारत आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत या दोन्ही टोकाच्या भूमिकेमधली मनोवस्था सांगितलेली आहे.
ती- मानव वा जीवसृष्टी कुठल्याना- कुठल्या प्रकारे पृथ्वीवरील जीवजीवन संपणार का तसेच असणार? त्याला भरपूर कारण आहेत अन भरपूर काळही. पण आपण जी मूल्य समाजात रुजवण्याचा प्रयत्न करतोय ती कदाचित तात्पुरती आहेत की दीर्घकाळ टिकणारी आहे काय? असा संशय येतो? ह्याचं स्पष्टीकरण कसं करशील?
तो- हे बघा आपल्याला काही काळ मागे जावं लागेल. 1935 ते 1985 पर्यंत संयुक्त राष्ट्र चळवळ ही भारतात सुद्धा कशा प्रमाणात होती किंवा कोणत्या अवस्थेत होती याचे एक उदाहरण म्हणजे सरदार वल्लभाई पटेल. सरदारांचा एक विचार होता एकात्मिक भारत. वल्लभभाई यांचं जे काही संस्थांनं एकत्रीकरणाचे धोरण होतं त्याची पुसटशी कल्पना आपल्याला 'एकात्मता आणि राष्ट्रीय एकात्मता' या दोन वेगळ्या संकल्पनेमध्ये दिसून येते. राष्ट्रीय एकात्मतेची अस्मिता जपणारा मानव समूह राष्ट्रीय एकात्मता जगतो कशी? त्याची पुसटसी संकल्पना या कथेच्या मूळतत्त्वाशी येते. म्हणजे परंपरागत आलेल्या या कथानकाचा भाग आहे फार मूल्ययुक्त सूचन देतो. शिकारी येतो, जाळे टाकतो, फास्यामध्ये चिमण्या अडकतात, त्या चिमण्यापाखरांची उडून जाण्याची धरपड, जाळे कुरतडण्याची कल्पना आणि नैतिकता, त्याला चालून आलेली जीवन जगण्याची पद्धती या चित्रपटाच्या मूळ अंशाचा भाग आहे.
तो- पुढच्या काळात 1972 च्या स्टॉकहोम परिषदेने पर्यावरण संरक्षणाकडे भारत सरकारचे लक्ष वेधले.1997 Constitution - 6 मध्ये घटनेत दुरुस्ती करून सरकारने दोन महत्त्वपूर्ण कलम A - 48 ए आणि A - 1 ए (जी) जोडलं. कलम AA ए राज्य सरकारला 'पर्यावरणाची सुरक्षा आणि सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी आणि देशातील जंगले आणि वन्यजीवांचे संरक्षण' करण्याचे निर्देश देते. अनुच्छेद A - 1 ए (जी) नागरिकांना 'नैसर्गिक वातावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यास आणि सर्व प्राण्यांशी दयाळूपणे' सक्षम बनवते. स्वातंत्र्यानंतर वाढती औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि लोकसंख्या वाढीमुळे पर्यावरणाची गुणवत्ता सतत कमी झाली. पर्यावरणाच्या गुणवत्तेच्या अभावी हे प्रभावी नियंत्रण आणि प्रदूषणाच्या संदर्भात सरकारने वेळोवेळी अनेक कायदे व नियम बनवले आहेत. यापैकी बहुतेक प्रदूषण नियंत्रण आणि प्रतिबंध हा मुख्य आधार होता. याचा परिपाक म्हणून जागतिक मानवी हक्क आणि त्याचे न्यायाधिकरण होत असतांना. कुणाच्याही हक्कावर गदा येऊ नये म्हणूनही "ऐकता में अनेकता और अनेकता में ऐकता" ही 'मानव व सजीव प्राणीपशुपक्षी नीती' जगमानसाने अंगिकरण्याचा हा काळ आहे. त्याचा पडसाद भारतीय चित्रपत्रसृष्टीवरही पडलेला आहे. आणि त्याचे वेगळे फलित म्हणून ही 'एक चिडीया' चित्रफीत बनवण्याचे मानसचित्र इथे उमटून दिसते.
ती- आजच्या काळाचं प्रारूप काय?
तो- अलीकडे अस्मितेमुळे होणारे वेगवेगळे जातीय, धार्मिक, नैतिक, राजकीय, आर्थिक, भाषिक, प्रांतिक बेटं यामुळे एकात्मतेला भगदाड पडत आहे. ते पडू नये हेच या कलाकृतीच्या आधारे सांगितले आहे. अशा काळात 'एकमेका साहाय्य करू' ही युक्ती जगणे गरजेचे आहे.
                                    मानवी जीवनाच्या मूळच्या तत्त्वावर आणि मानवतावादावर आधारित जे काही मूल्ये असतील ती मूल्य सांभाळून ठेवणे, त्याची प्रत्येक पिढीवर उकल करून ही मूल्ये गरजेचे आहेत हे सांगत राहणे आणि संविधानिक मूल्ये ही मानवी हिताच्या संवर्धनासाठी आहेत आणि या मूल्यांशी प्रामाणिक राहत मानवी जीवन सर्वांशपूरक जगणं हे काळाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. अन्याय सहन करत हे जगणं नाही तर ते गुलामीपण असेल असं प्रत्येक पिढीला समजून सांगणे, अशी भूमिका निर्माण करणारे तत्त्व या समाजामध्ये पेरणे गरजेचे आहे. अशा तात्विक विचाराच्या पिढी निर्माण करणे गरजेचे आहे. अशी एक वेगळी कल्पना त्या चित्रफितीच्या संहिता काळामध्ये अंतर्भूत होते आहे.
ती- आजच्या या काळच्या वैश्विक महामारीत तू काय विचार करतो आहेस?
तो- यासाठी माझं सगळं आयुष्य समजावं लागेल. तू जगशील तो जगतो तसा!

संदर्भ-
'एक चिडीया' बालचित्रफीत, भारतीय चित्रपट निर्मिती संग्रहालय, पुणे महाराष्ट्र, 1980.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पाचवी जनआवृत्ती, 14 एप्रिल  धनंजय कीर, 2016.
समीक्षेतील नव्या संकल्पना - संपादक - डॉ. मनोहर जाधव, 2010.
गुलामगिरी, बारावी जनआवृत्ती, महात्मा जोतिराव फुले.
टाइम्स, अंक, 1972 ची पर्यावरण संरक्षण स्टॉकहोम परिषद, 2015.
सांस्कृतिक मूल्यवेध - रा. ग. जाधव, 1999.
लोकसत्ता, सरदार वल्लभभाई पटेल जयंती अग्रलेख, 2020

टीप- 

https://youtu.be/fQ4TZIn4CJM

वरील लिंकवर विश्वनाथ साठे यांनी केलेले या लेखावरील समीक्षात्मक भाष्य आहे.

-विश्वनाथ साठे (9921056462)

No comments

Powered by Blogger.