Header Ads

Header ADS

जाती-धर्माचा खेळ, कसा साधायचा एकतेचा मेळ ?

जाती-धर्माचा खेळ, कसा साधायचा एकतेचा मेळ ?
Maisaheb

एका शहरामध्ये, शहरातील सर्व पुतळे एका चौकात जमा होतात. सर्वजण स्वतःची कैफियत मांडत असतात, सर्वात पहिल्यांदा तथागत गौतम बुद्ध म्हणतात, “सर्व जगाला मी समता आणि शांततेचा संदेश दिला, मात्र मला ह्या लोकांनी बौद्ध धर्मापुरतेच मर्यादित ठेवले.” त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, “संपूर्ण अठरा पगड जातींसाठी मी स्वराज्य उभारले, आणि या लोकांनी मला मात्र मराठ्यांचा राजा असे बिरूद लावले.” त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, “इथल्या जनतेसाठी संविधान तयार केले, मात्र या लोकांनी मला दलित लोकांसाठी कार्य केले असे म्हणत मला त्यांचाच नेता करून टाकले.” महात्मा फुले म्हणाले, “भारतातील महिलांच्या शिक्षणासाठी मी इतका संघर्ष केला, पण या लोकांनी मात्र मला माळी जातीपुरते मर्यादित ठेवले.” या सर्वांचे ऐकून झाल्यानंतर महात्मा गांधीजी म्हणाले, “तुम्हा सर्वाना निदान एका जातीने अथवा धर्माने तरी वाटून घेतले, मी मात्र आयुष्यभर इथल्या लोकांसाठी लढलो, पण माझे विचार मात्र सरकारी कार्यालयाच्या भिंतीवरती आणि नोटेपुरतेच मर्यादित राहिले आहेत. उदाहरण जरी काल्पनिक असले तरी त्यातील संदेश मात्र वास्तवाचे दर्शन घडवतो. मग प्रश्न पडायला लागतो कि हा जातीधर्माचा खेळ थांबवून एकतेचा मेळ कसा साधायचा ?
हा विषय प्रामुख्याने चार टप्प्यात मांडावासा वाटतो. पहिला टप्पा म्हणजे जात आणि धर्म यांची संकल्पना व जातीधर्माचा समाजव्यवस्थेवरील विळखा. दुसरा टप्पा म्हणजे जाती-धर्माच्या खेळाची उदाहरणे. तिसरा टप्पा म्हणजे जाती-धर्माच्या वादात समाजावर झालेले वाईट परिणाम. आणि चौथा टप्पा म्हणजे जाती-धर्माच्या संकटावर एकतेचा मेळ कसा घालावा ?
पहिल्या टप्पा, जी ‘जात’ नाही गोचीडासारखी चिकटून बसते ती म्हणजे जात. आणि असत्यावर विजय मिळवण्यासाठी आपण ज्याचा आधार घेतो, तो म्हणजे ‘धर्म’. जगामध्ये प्राण्यांच्या ८४ लाख प्रजाती आहेत. मात्र या प्रजातीतील, ‘मानव’ या प्राण्याच्या प्रजातीत हजारो जाती असलेल्या आपल्याला दिसायला लागतात. इतर प्रजाती स्वतःमध्ये कधीही जात तयार करत नाही, पण माणसाने प्राण्यांच्या प्रजातीत देखील जाती तयार केल्या आहेत. उदा. म्हैस या जनावराच्या प्रजातीत, मुरा म्हैस, पंढरपुरी म्हैस, हरियाणी म्हैस या जाती माणसाने तयार केल्या. जाती-धर्माने आपल्या समाजाला इतके जखडले आहे की, जन्माला येण्यापूर्वी एखाद्या अपत्याचे नाव ठरलेले नसते, मात्र जन्मापूर्वीच त्याची जात आणि धर्म ठरलेला असतो.
 दैनिक लोकसत्ताचे व्यंगचित्रकार ‘प्रशांत कुलकर्णी’ यांनी लोकसत्तामध्ये व्यंगचित्र काढले होते. ते व्यंगचित्र असे होते, खुर्चीमध्ये महात्मा गांधीजी बसलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये एक वर्तमानपत्र आहे आणि गांधीजींच्या डोळ्यात अश्रू आहेत. ते वाचत असलेल्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर लिहिलेले होते हिंदू ८०%, मुस्लिम ११%, बौद्ध ३% व अन्य ६% असे वेगवेगळ्या धर्माची आकडेवारी दिली होती. आणि शेवटी गांधीजींच्या तोंडातून वाक्य बाहेर पडले होते, “फारच वाईट बातमी आहे. माझ्या काळात तर भारतीयांची संख्या अधिक होती.” म्हणजेच आज २१ व्या शतकात देखील जातीधर्माने भारतीयांना जखडले आहे.
यानंतर या विषयाचा दुसरा टप्पा म्हणजे जाती-धर्माच्या खेळायची उदाहरणे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे कर्तृत्व हे त्याच्या धर्मावरून किंवा जातीवरून ठरवले जाते, तेव्हा जाती-धर्माच्या खेळाला सुरुवात होते. इतिहासातील उदाहरण सांगायचे झाले तर, महाभारतामध्ये द्रोणाचार्यांनी ‘एकलव्याला’ त्याच्या जातीधर्मावरून गुरुदक्षिणा नाकारली होती. पूर्वी आपण गाणे म्हणायचो,
उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते.”
“सरणावरती आज अमुची पेटतात प्रेते,
 पण आज हेच गाणे बदललेले आहे.


उठतील त्या ज्वालातून भावी त्याच जातीचे नेते.”
सरणावरती आज अमुची पेटतात प्रेते,
असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. १९४७ साली भारत व पाकिस्तान या दोन राष्ट्रांची निर्मिती झाली तेंव्हा जाती धर्मावरून उद्भवलेल्या गदारोळात हजारो लोकांना स्व:ताचा जीव गमवावा लागला. १९८४ मध्ये दिल्लीमध्ये धर्मावरून दंगल झाली. १९८९ साली बिहारमधील ‘भालगपूर’ याठिकाणी जातीय दंगल झाली. १९९२ साली बाबरी मशीद की राम मंदिर या वादातून ती वास्तू पाडली, व त्यामुळे उसळलेल्या दंगलीत दोन हजार लोकांना स्वतःच्या जीव गमवावा लागला होता. २००२ मध्ये गोध्रा हत्याकांड घडले. २०१३ साली उत्तर प्रदेशमधील ‘मुझफ्फरनगर’ याठिकाणी जातीय दंगल घडली. १ जानेवारी २०१८ रोजी महाराष्ट्रातील ‘भीमा-कोरेगाव’ या ठिकाणी जातीय दंगल घडली. ‘नॅशनल क्राईम रिपोर्टच्या आकडेवारीनुसार २०१८ या एका वर्षात जातीय दंगलीमध्ये ८२० लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला.
जाती-धर्माच्या खेळाचे आणखी एक वेगळे स्वरूप म्हणजे काही मुस्लीम व्यक्ती दहशतवादी असल्या म्हणून सर्वच मुस्लीम लोकांना दहशतवादी ठरवणे कितपत योग्य आहे ? कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ‘डोनाल्ड ट्रम्प’ यांनी सुरक्षेचे कारण समोर करून सात मुस्लिम बहु देशांना ९० दिवसांसाठी अमेरिकेत येण्यास बंदी घातलेली होती. श्रीलंकेत उसळलेल्या धर्मीय हिंसाचारामुळे दहा दिवस संपूर्ण देशात ‘आणीबाणी’ घोषित करावी लागली होती. अनेक पिढ्या ‘म्यानमारमध्ये’ राहूनसुद्धा रोहिंग्यांना म्यानमारमधून अक्षरशा हाकलून बाहेर काढण्यात आले. जाती-धर्माच्या खेळाचा आणखी एक भाग म्हणजे जाती-धर्मावर आधारीत असलेल्या अंधश्रद्धा. दिल्लीमध्ये काही महिन्यांपूर्वी मोक्ष मिळवण्यासाठी धर्माचा चुकीचा आधार घेवून घरातील ११ जणांनी सामूहिक आत्महत्या केली होती. जाती-धर्माच्या नावाखाली आतापर्यंत नरबळीच्या हजारो घटना घडलेल्या आहेत. आसाराम बापू, राम रहीम यांसारखे बाबा फक्त जाती-धर्माच्या खेळामुळे जन्माला आले आहेत. आज कित्येक जातीचा फक्त ‘व्होट बँक’ म्हणून राजकारणी उपयोग करतात. निवडणुका जवळ आल्या की देशातील महत्त्वाचे नेते राज्यातील अनेक मठामध्ये व मंदिरांमध्ये जात असलेले दिसायला लागतात.
या विषयाचा तीसरा टप्पा म्हणजे जाती-धर्माचा आपल्या समाजव्यवस्थेवर होत असलेले परिणाम. या जाती-धर्माच्या खेळाचा सर्वात वाईट परिणाम कोणता होत असेल तर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीलासुद्धा जात आणि धर्म असतो, आणि बलात्काराची तीव्रता ही जाती-धर्मावर अवलंबून असते, हे आमच्या इथल्या अनेक मोर्च्यानी दाखवून दिले. मराठा जातीच्या मुलीवर बलात्कार झाला तेंव्हा फक्त मराठ्यांचे मोर्चे निघाले. काश्मीरमध्ये मुस्लीम मुलीवर जेव्हा बलात्कार झाला, तेंव्हा फक्त मुस्लीम लोकांनी मोर्चा काढला. आणि जाती-धर्माच्या खेळाचा आणखी एक वाईट परिणाम जर कोणता असेल, तर गोविंद पानसरे, डॉक्टर दाभोळकर, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या होय. ‘दशक्रिया’ या मराठी चित्रपटाला एका जातीने विरोध केला, तर दुसऱ्या जातीने त्याचा चित्रपटला उचलून धरले. दीपा मेहतांच्या ‘वॉटर’ नावाच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या जागेवर हल्ला करण्यात आला, कारण या चित्रपटात बनारसमध्ये होत असलेल्या धर्माच्या ऐतिहासिक परंपरा यांचे चित्रण करण्यात आले होते. आज काल व्हाट्सअपच्या गुड मॉर्निंगच्या मेसेजला सुद्धा जाती-धर्माचा स्पर्श झालेला आहे. शुभ-सकाळ आज शिवसकाळ आणि भिमसकाळ होत आहे. तसेच आजकाल वादळांनासुद्धा जाती-धर्माचा रंग मिळाला आहे. हे भगवे वादळ, हे निळे वादळ, ते पिवळे वादळ इथपर्यंत आज जातीव्यवस्था पोहचलेली आहे. जगातील सात आश्चर्यांपैकी पहिल्या क्रमांकावर असलेला ‘ताजमहाल’ जगासाठी प्रेमाची उत्तम निशानी आहे. पण भारतामध्ये ताजमहाल की तेजोमहाल या वादात अजूनही अनेक लोक अडकून पडलेले आहेत.
या विषयाचा चौथा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे जाती धर्माचा खेळ थांबवून एकतेचा मेळ कसा साधायचा ? एकतेचा मेळ साधण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी विश्वासाठी मागितलेल्या पसायदानाची गरज आहे. महावीरांचे ‘जगा आणि जगू द्या’ या तत्वाची गरज आहे. गौतम बुद्धांच्या समतेचे तत्त्वज्ञान, आणि शिकागोच्या धर्मपरिषदेत स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या माणुसकीच्या धर्माची गरज आहे. या सर्व गोष्टींचे अंतिम सत्य कोणते असेल तर ‘माणूसकी’ होय. म्हणून तर ‘ऑरीस्टॉटर’  म्हणाला होता, “माणसे जन्माला येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते” म्हणजेच एकतेसाठी आपल्याला माणूसकी निर्माण करायला हवी. संत गाडगेबाबा म्हणाले होते, “कीर्ती धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी.” असे सांगून माणसाच्या धर्मातील विषमतेला दूर केले होते. संत तुकाराम म्हणाले होते,
“विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म,
भेदाभेद भ्रम अमंगल.”
आज एकतेसाठी पुन्हा एकदा संत गाडगेबाबांच्या आणि संत तुकारामांच्या अभंगांची गरज आहे. त्यामुळे एक वेळ धंद्याला धर्म म्हणावे, पण धर्माचा आणि जातीचा कधी धंदा होऊ देऊ नये. एकता निर्माण करण्यासाठी आणखी एक उपाय करायला हवा. अपत्य जन्माला आल्यानंतर त्याचा जन्म दाखला तयार होत असताना किंवा शाळेमध्ये प्रवेश घेत असताना जो फॉर्म भरला जातो, त्यावरील धर्म आणि जात याचा उल्लेख काढून टाकला पाहिजे. ७८६ या मुस्लिम धर्माच्या पवित्र अंकाची बेरीज २१ येते. आणि गणपतीला नैवेद्यसुद्धा २१ मोदकांचा देतात म्हणजेच सर्व धर्म हे एक आहेत. जाती-धर्मात एकता निर्माण करण्यासाठी विविध जातींचे सण सुखासमाधानाने सर्वांनी एकत्र करून सादर करावेत मात्र सण हे जातीधर्मातील तणावाचे कारण बनवू नयेत याची आपण काळजी घेतली पाहिजे. सोशल मीडियावरील जाती-धर्माची तेढ निर्माण करणारे लेख व पोस्ट डिलीट करायला हव्यात, यासाठी सायबर पेट्रोलिंग राबवायला हवे.

“जन्मलेल्या बाळाला न सांगावी धर्म जात,

सांगावे त्यास फक्त माणुसकीचा प्रवास,
दीन-गरजूंना असावी साऱ्यांचीच साथ,
हसत खेळत जगावे विसरून धर्म जात.”

माईसाहेब स्मृती उत्सव समिती, कोल्हापूर तर्फे आयोजित निबंध स्पर्धेतील निवडक निबंध, आशयघन व समाज उपयुक्त म्हणून केला प्रसिद्ध ईये ई साहित्य मंचावरी !


सौरभ संजय पाटील
भौतिकशास्त्र विभाग,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
मोबाईल क्र .७०३८८२११९८
ई-मेल sourabhpatil21198@gmail.com

No comments

Powered by Blogger.